‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती.

‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती. पु. ल. देशपांडय़ांनी मूळ नाटकात लिहिलेली छंदोबद्ध दोन गाणी वगळता नंदूची सर्व गाणी ही मी पुलंच्या गद्य संवादांना चाली लावून त्यांचे गाण्यात रूपांतर केलेली अशी होती. या माझ्या प्रयोगाची दखल अनेक रसिकांनी, विशेषत: तरुणाई आणि जिंदादिल बुजुर्गानीही घेतली. यात सदैव संगीतातल्या नव्या प्रवाहांना समजून घेऊन त्यांचे स्वागत करण्याची वृत्ती असलेले ख्यातनाम गायक पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकीसुद्धा होते. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या मराठी ‘युवदर्शन’ कार्यक्रमाचे निर्माते अरुण काकतकर आणि विनय आपटे यांनी त्यांच्या मराठी ‘युवदर्शन’करिता नवी मराठी पॉप गाणी संगीतबद्ध करून सादर करण्याचे आवतण मला दिले. बीटल्स आणि तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘एबीबीए’ या ग्रुपच्या गाण्यांचे शब्द हे अतिशय सुंदर कविताच आहेत, याची माझ्या मनानं कधीचीच नोंद घेतली होती आणि मग उत्तम आशय असणारे, पण सहजतेनं श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आणि सहज संवाद करणारे शब्द हे आपल्या या नव्या मराठी पॉप गाण्यांचा पाया असायला हवा, हे मी मनाशी ठरवलं. आणि माझ्या स्मरणातून एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे माझ्या पिढीतले माझ्या आणि त्याआधीच्या पिढय़ांशी आपल्या कवितेतून सहज संवाद साधणारे कविवर्य सुधीर मोघे. ‘स्वरानंद, पुणे’च्या ‘आपली आवड’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ यासारख्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांत गायक-गायिकांइतकीच दाद मिळवून जायचे निवेदक सुधीर मोघे. लोकप्रिय गाण्यापूर्वीच्या निवेदनात मोघ्यांचीच एखादी मुक्तछंदातली कविता ही तिच्या अंगीभूत संवादी सामर्थ्यांनं ‘हय़ा हृदयीचे त्या हृदयी’ अशी रसिकांना भावून जायची आणि प्रचंड टाळय़ांच्या दादेतून मोघ्यांना तत्काळ पावती मिळायची. मला एकदम त्या मनभावन मुक्तछंदात्मक संवादी कवितांची आठवण झाली. आणि येस.. त्या कविता मला कुठेतरी बीटल्स किंवा ‘एबीबीए’च्या गाण्यांच्या शब्दकळेच्या जातकुळीच्या वाटल्या. कॅफे डिलाइटमध्ये मोघ्यांना गाठलं. त्यांना ती कल्पना फारच आवडली. काय होईल, कसं होईल याचा काही अंदाज नव्हता; पण माझ्यावर विश्वास होता. मोघ्यांनी तात्काळ त्यांच्या पाच-सात कविता माझ्या हवाली केल्या आणि ते निवांत झाले आणि मी अस्वस्थ. माझ्या डोक्यात मराठी पॉप गाण्यांकरिता संगीताची चक्रं फिरू लागली.
नंदू भेंडेच्या पाश्चात्त्य गानशैलीच्या अत्यंत टवटवीत स्वरातून अनोख्या अंदाजानं साकारलं गाणं..
‘दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं
पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..’
यासारखी पाच गाणी अध्र्या तासाच्या कार्यक्रमाकरता मी स्वरबद्ध केली. त्यात दोन सोलो, एक डय़ुएट, एक ट्रीप्लेट आणि एक क्वाटर्र्ेट अशा विविध पद्धतीची गाणी मी निवडली.
‘एक सांगशील-
आपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना..
हे देखणे वळण कसे भेटले?’
हे आणि-
‘तुझ्या माझ्या सहवासाचा योग,
आपल्या कुंडलीत कुठून लाभला?
ही नारिंगी संध्याकाळ, ही सुखाची सफर,
हा झकास बेत कसा जमला?’
अशी दोन सोलो गाणी रवींद्र साठे व नंदू भेंडेकरिता, तर ‘आपल्या आयुष्यात प्रेम येतं’ नंदू भेंडेबरोबर माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले हे तिघांचं गाणं.
मोघ्यांनी जणू काही परीक्षाच घ्यायला तीन मुक्तकांनी युक्त अशी एक रचना मला दिली. त्याला धृपदच नव्हतं. कारण प्रत्येक मुक्तकाची स्वतंत्र रचना होती.
‘एका समंजस सावध क्षणी
माझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं..
खरं म्हणजे खडसावलंच..
होणार नाही कोणी दिवा..
मिळणार नाही उबदार हात..
तुझी तुलाच चालावी लागेल..
पायाखालची एकाकी वाट..
हे त्यानं सांगितलं आणि मला पटलं तेव्हा..
वाट जवळजवळ संपली होती.
घावांवर उसनी फुंकर कशाला..
त्याचं कौतुक कुणाला आहे..?
निमूट वेदना सोसण्याइतकं..
माझं काळीज खंबीर आहे..
खंजीर धारदार.. कबूल..
परंतु तो केवळ निमित्त असतो..
खंजीर पेलणारा हात मात्र..
न बुजणारी जखम करतो..
आभाळ मायेनं ओथंबून येईल..
सुगंधी वारे आप्त होतील..
माझा पत्ता विचारीत
तुझी सारी दानं आपसूक येतील..
हे घडेल- नव्हे, घडणारच..
तू फक्त एक सांग..
तेव्हा मी कुठे असेन..?’
माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले या दोन स्त्री- स्वरांतलं हे गाणं संगीतबद्ध करताना मी की-बोर्डवर वाजणारी एक स्वरावली या गाण्याचे पालुपद किंवा धृपद म्हणून योजली.
शेवटचं क्वार्ट्रेट- म्हणजे चौघांनी मिळून म्हटलेलं गाणं म्हणजे (मोघ्यांची एक वात्रटिकाच होती.) पत्नी या प्रकरणाविषयी नवऱ्याचं- आय मिन पुरुषाचं मजेदार गाऱ्हाणं होतं..
‘खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो..
एका दुर्लभ क्षणी.. एक चेहरा आपल्याला भेटतो..
अक्कल गहाण पडते.. भेजा कामातून जातो.. टक्क उघडय़ा डोळय़ांनी आपण चक्क लग्न करतो..
त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं..
बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं..
हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का?..
सगळय़ा मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का?’
मी मोघ्यांना म्हणालो, की तुम्हाला यात बायकोचीही बाजू मांडावी लागेल. तुम्ही पुरुष म्हणून बायस राहून चालणार नाही. मग मोघ्यांनी खास माझ्याकरिता तीही बाजू फार सुंदर मांडली..
‘सगळे पुरुष एकजात ढोंगी कांगावखोर
बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर
लग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात
त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात
प्रेयसी कशी स्मार्ट, चंट आणि बिनधास्त हवी
लग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी
प्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का?
सगळय़ा मुलांचं लग्नानंतर हे अस्संच होतं का?’
रवींद्र साठे, नंदू भेंडे, माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले या चौघांनी हे धमाल गाणं मस्त गायलं.
आणि १९७९ च्या मार्च महिन्यात माझा मितवा अभिनेता-दिग्दर्शक मोहन गोखले याच्या सुंदर निवेदनासह मुंबई दूरदर्शनच्या मराठी ‘युवादर्शन’ कार्यक्रमात ही मराठी पॉप गाणी प्रसारित झाली. या कार्यक्रमाची प्रसिद्धी तेव्हाच्या पॉलीडोर रेकॉर्ड कंपनीपर्यंत पोहोचली आणि त्यांनी नंदू भेंडेशी संपर्क साधून ‘आपल्या आयुष्यात प्रेम येतं’ या पहिल्या नव्या मराठी पॉप गाण्यांची एक्स्टेन्डेड प्ले-रेकॉर्ड प्रकाशित केली. या ध्वनिमुद्रिकेमध्ये नंदू भेंडेचा प्रमुख सहभाग असून, माधुरी पुरंदरेबरोबर डय़ुएटकरिता तेव्हा नुकतीच प्रकाशात येत असलेली कविता कृष्णमूर्ती ही गायली. तर चौघांच्या गाण्यात या तिघांबरोबर रवींद्र साठेचाही सहभाग होता. चित्रपट संगीतातले नामवंत म्युझिक अ‍ॅरेंजर इनॉक डॅनियल्स यांनी या अल्बमचं अप्रतिम संगीत संयोजन केलं, तर सुनील गांगुली (इलेक्ट्रिक गिटार), आमोन (बेस गिटार), फ्रांको (ड्रम्स), अशोक पत्की (सिंथेसायझर), दिलीप नाईक (स्पॅनिश गिटार), ट्रम्पेट (जोसेफ), मनोहर बर्वे (कोंगो/तुंबा) आणि स्वत: इनॉकजी (की-बोर्ड) असे नामवंत साथीला. मला आठवतं, सोमवारी ते रेकॉर्डिग होतं आणि आदल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाटय़ मंदिरातील ‘तीन पैशा’च्या प्रयोगाला माझ्या आमंत्रणावरून इनॉकजी आले होते आणि अनपेक्षितपणे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार सी. रामचंद्र ऊर्फ अण्णासाहेब चितळकर साक्षात् आले. इंटव्‍‌र्हलमध्ये मी अण्णांच्या पाया पडलो आणि म्हणालो, ‘अण्णा, उद्या माझ्या आयुष्यातली पहिली ध्वनिमुद्रिका मी रेडिओजेम्समध्ये रेकॉर्ड करतोय. तुम्ही प्लीज मला आशीर्वाद द्यायला यावं अशी विनंती आहे.’
‘तमाशा’च्या संगीतामुळे केवळ माझ्यावरच नव्हे, तर आम्हा सगळय़ांवर प्रचंड खूश असलेले आणि मुंबईतल्या आमच्या प्रत्येक प्रयोगाला आवर्जून हजेरी लावणारे दर्यादिल, जिंदादिल अण्णा दुसऱ्या दिवशी माझ्या रेकॉर्डिगला आले. त्यांच्या पावलांवर डोकं टेकवून मी आशीर्वाद घेतला. त्यांनी पहिल्या गाण्याची चाल ऐकली. मोघ्यांच्या कवितेला आणि माझ्या चालीला दिलखुलास दाद दिली. राजबिंडय़ा व्यक्तिमत्त्वाचे अण्णांचे आशीर्वाद मला माझ्या पहिल्या रेकॉर्डिगच्या वेळी मिळाले, हा माझ्या मोजक्या भाग्ययोगांपैकी एक. म्हणून संस्मरणीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *